Jayant Patil's Suspension: निलंबनावर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया : मुख्यमंत्र्यांचा तो अविर्भाव.

Jayant Patil's Suspension: निलंबनावर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया : मुख्यमंत्र्यांचा तो अविर्भाव.


नागपूर : सत्तारुढ पक्षाला प्रश्न विचारून अडचणीत आणण्याची संधी असताना आम्हाला बोलण्याची संधी नाकारण्यात आली. विरोधी पक्षाचा (opposition party) आवाज दाबवण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे सरकारने निर्लज्जपणा करू नये, असे मी बोललो. पण सरकारला आज कोणाचा तरी विषय टाळायाचा होता. त्यासाठी माझे निलंबन करण्यात आले. पण, सरकारला उद्देशून बोललो, ते विधानसभा अध्यक्षांना चिकटवले आणि माझे निलंबन करण्यात आले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निलंबनावर दिली. (Jayant Patil's first reaction to the suspension)

विधानसभेत बोलताना अपशब्द वापरण्यात आल्याने आमदार जयंत पाटील यांना येत्या ३० डिसेंबरपर्यंत म्हणजे हिवाळी अधिवेशनापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर माध्यमाशी बोलताना पाटील यांनी त्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, जो विषय संपलेला आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो विषय गेलेला आहे. त्या विषयाबद्दल नको ती विधानं सत्ताधारी आमदार करत आहेत. एकामागून एक १४ सत्ताधारी आमदारांना सभागृह तहकूब करून बोलण्याची संधी दिली जाते. विरोधी आमदारांना बोलू दिलं जात नाही. शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाजू मांडण्यासाठी भास्कर जाधव वारंवार संधी मागत होते. मात्र, त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाचे आमदार वेलमध्ये येऊन आम्हाला बोलू द्या, अशी मागणी करत होते.

हा प्रकार सुरू असताना यासंदर्भात सरकार कसं कोडगेपणाने वागत आहे, याबाबतची भावना विरोधी पक्षाच्या आमदारांकडून व्यक्त होत होती. म्हणून मी सरकारला आवाहन केलं की निर्ल्लजपणासारखं वागू नका. याचा अर्थ हा आहे की, सत्तारुढ पक्षाबरोबरच विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी आम्ही करत होतो. मी माझ्या जागेवर बसून माझा माईक चालू नसताना बोललो होतो, तरीही माझ्या निलंबनाचा ठराव मांडण्यात आला. ती घटना झालेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यावेळचा अविर्भाव गॅलरीतील पत्रकारांनी पाहिला असेल, त्यातून मुख्यमंत्री कोणते शब्द वापरू शकतात आणि कशा पद्धतीचे शब्द वापरू शकतात, हे राज्यातील जनतेने पाहिले असतील असं मला वाटतंय, असे पाटील म्हणाले.

पाटील म्हणाले की, मी गेली ३२ ते ३३ वर्षे विधानसभेत असताना माझ्याकडून कधीही कोणालाही अपशब्द वापरला गेला नाही. माझा माईक चालू नव्हता आणि माझं भाषण चालू नव्हतं, त्यामुळे मी जे काही बोललो, ते सरकारने या गोष्टी टाळाव्यात म्हणून बोललो. पण सरकारला आज काहीतरी करून कोणाचा तरी विषय टाळायचा होता. त्यामुळे मी अध्यक्षांबाबत बोललो, असे चिकटवले. वास्तविक मी सरकारच्या काराभाबाबत बोलत होतो. बहुमताच्या जोरावर ते माझे निलंबन करत आहेत, त्याबाबत माझी काहीही तक्रार नाही. राज्यातील जनता सुजाण आहे.

राज्यातील विरोधी पक्षाला बोलायची संधी द्या, अशी माझी भावना होती. त्यातूनच मी तो शब्द बोलून गेलो. मात्र, तो सरकारच्या कारभाराबाबत होता, विधानसभा अध्यक्षांबाबत नव्हता, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. मनाला लागलं असेल तर आमच्या सर्वांच्या वतीने त्यांनी आमची भूमिका विशद केली आहे, असेही त्यांनी सांगितले.


SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook