पुणे : श्रावण महाडिक यांचे दि.८ रोजी दापोडी (पिंपरी चिंचवड) येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ६० वर्षे होते. अतिशय प्रेमळ, मनमिळावू, मीतभाषी स्वभाव ही त्यांची ओळख. मात्र जेष्ठ कवी, लेखक, थोर विचारवंत, कादंबरीकार पँथर चळवळीचे नेते साहित्यकार पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या चळवळीत आक्रमक योद्धा अशी श्रावण महाडिक यांची छबी होती. पिंपरी चिंचवड येथील पँथर च्या छावनीचे ते माजी शहराध्यक्ष होते. यामाध्यमातून दलित, पीडित, वंचितांच्या पाठीशी ढाल बनून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लाठ्या काठ्या खात संघर्ष केला. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची चळवळ श्रावण महाडिक यांनी जोपासली. पंचशील नगर पाच्छापूर येथील आपल्या गावी प्रत्येक सुख दुःखात, धार्मिक कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होत असत. त्यांना आपल्या गावाप्रती प्रचंड प्रेम आणि आत्मियता होती. गावाच्या प्रगतीसाठी ते सतत पुढाकार घेत असत. त्यांच्या निधनाने पंचशील नगर पाच्छापूर व पिंपरी चिंचवड दापोडी येथील भीम अनुयायांनी कधी ना भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. दिवंगत श्रावण महाडिक यांच्या पश्चात त्यांना पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दि. महाडिक यांच्या जलदान विधी व शोकसभेचा कार्यक्रम सोमवार दि. १८ नोव्हेंबर रोजी, अग्रेसन भवन दापोडी रेल्वे स्टेशन मागे सुंदरबाग कॉलनी, दापोडी पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.