सुमारे १२०० किलोमीटर पसरलेल्या आल्प्स पर्वतरांगेला युरोपात अनन्यसाधारण महत्व आहे. युरोपातील अनेक देशांतील नैसर्गिक सौंदर्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे ही पर्वतरांग. आपल्याकडे जसं हिमालयाचं महत्व आहे तसंच युरोपात आल्प्सचं महत्व आहे. मॅटरहॉर्न हे १४६९० फूट उंचीचं आल्प्समधील ६ व्या क्रमांकाचं गिरीशिखर आहे. याच मॅटरहॉर्नवर स्वित्झर्लंडमधील लाईट आर्टिस्ट गेरी हॉफस्टेटर यांनी तिरंगा झळकवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पर्वतावर मागील २४ मार्चपासून कोरोना महामारीविरोधात जगातील देशांची एकजूट दर्शवण्यासाठी विविध देशांचे झेंडे झळकवण्यात आले आहेत. स्वित्झर्लंडमध्ये कोविड-१९ ने आतापर्यंत १८ हजार लोकांना बाधा झाली आहे. तसेच ४३० लोकांचा मृत्यू झाला आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात दीड लाखांहुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या २२ लाखांवर पोहोचली आहे.