कृषिमंत्र्यांच्या सूचना; राज्यात 140 लाख हेक्टर क्षेत्रांवर होणार पेरणी
पुणे – करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, त्यातून शेतीच्या कामांना वगळण्यात आले असून या पार्श्वभूमीवर राज्यात 140 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप 2020चे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे, यासाठी आवश्यक त्या बियाणांची उपलब्धता आहे. खरिपाचे नियोजन करताना त्यात शेतकरी हित केंद्रीत ठेवावे. जिल्हा आणि विभागीय स्तरावरील नियोजन 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी विभागाला दिल्या आहेत.
…. असे आहे नियोजन
राज्यात 140 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप 2020चे नियोजन केले जाणार आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी यांचा समावेश आहे. यासाठी सुमारे 16.57 लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि खासगी बियाणे कंपन्यांकडून बियाण्यांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खरीप हंगामासाठी केंद्र शासनाकडून 40 लाख मेट्रीक टन खत पुरवठा केला जाणार आहे.