सध्या तूर डाळीसह अन्य डाळींची मागणी वाढली आहे. ग्राहकांकडून दररोज मागणी वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात डाळीचे उत्पादन 240 ते 250 लाख टन होते. डाळींचे उत्पादन वाढल्याने अनेक डाळी आधारभूत किमतीपेक्षा कमी भावात विकत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत होते. त्यामुळे सरकारने डाळींच्या आयातीवर निर्बंध लावण्याचे आदेश जारी केले होते. विदेशातून चणा, तूर, मूग, उडीद, वाटाणा, मसूर, काबुली चणा आयात होतो. आता मात्र आयातीचे निर्बंध हटविले आहेत. तसेच देशात डाळींचे भाव किमान आधारभूत किमतींपेक्षा कमी राहिले आहेत. त्यामुळे ग्राहकांचाही खरेदी करण्याकडे कल असल्याचे विक्रेते शामकुमार द्विवेदी यांनी सांगितले.
ते म्हणाले, मार्च महिन्याच्या सुरुवातीला करोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने देशात सुरक्षेच्या दृष्टीने 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतरही 3 मेपर्यंत मुदत वाढवली. तसेच शहरातील चिकन, मटनची दुकानेही बंद आहेत. जी दुकाने सुरू आहेत त्यांना पुढील आठवड्यापासून फक्त तीनच दिवस दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. त्यातच भाजी मंडईवर लादलेले निर्बंध, घटलेली आवक आणि वाढलेले दर त्यामुळे पालेभाज्यांचे दरही आभाळाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्व प्रकारच्या दाळींनाच पसंदी दिल्यामुळे दाळींची मागणी वाढली आहे.