मुंबई – देशातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. जात, देश, धर्म कुठलाही असो, व्हायरस एकच आहे. ‘इलाज एकच, नाईलाज म्हणून घरात रहा’ असा संदेश त्यांनी जनतेला दिला. तसेच डॉक्टर, नर्सेससोबत गैरवर्तन कराल तर खबरदार, सहन केलं जाणार नाही. समाजामध्ये दुही निर्माण करणाऱ्यांनो खबरदार असाही ईशारा त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान ते पुढे म्हणाले, ‘फेक व्हिडीओज पाठवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, फेक व्हिडीओज पाठवून दुफळी निर्माण करू नका’. त्याने तुम्हालाच धोका आहे हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात चाचण्या वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांमध्ये असाध्य रोगी, जास्त वृद्धांची अधिक संख्या आहे. त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
सर्व धर्मियांनी आपले सण, उत्सव घरातच साजरे करा. तबलिगींचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात होऊ दिला नाही. मरकजमधून आलेल्या लोकांना १०० टक्के विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येत आहे . तसेच राज्यात अडकलेल्या परप्रांतियांची आम्ही सोय केली आहे, कोणीही घाबरुन जाऊ नये. परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील मजूरांची, कामगारांची काळजी घ्या. आणि जिथे असाल तिथेच थांबा, तुमची सोय केली जाईल.
‘इलाज एकच, नाईलाज म्हणून घरात राहणे’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे