पुणे : पुण्यातील ट्रॅफिक हे दिवसेंदिवस वाढतच होतं. मुंबई नंतर महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. आधी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता दुचाकी आणि ट्रॅफिक मुळे ओळखले जाते. वाढते ट्रॅफिकचे नियोजन पाहता राज्य सरकार सह केंद्र सरकारने पुण्यात मेट्रोच्या विविध मार्गांसाठी परवानगी दिली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील काम तसेच पुण्यातील वनाज मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे.
तर शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गिकेतील अनेक अडचण येत असल्याने अजून काम सुरु झालेले नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सद्या या मेट्रोमार्गाच्या कामात अडचणीचा ठरणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल लॉकडाऊन मध्ये पाडला जाऊ शकतो अशा सुचना दिल्याची बातमी, टीव्ही९ नुसार मिळत आहे.
दरम्यान, लॉक डाऊन हा अजून वाढण्याची शक्यता असल्याने यातच हा पुल पाडला जाऊ शकतो. टाटा कंपनीने यासाठी तयारी दर्शविली असून या ठिकाणी हा पुल पडून नवीन दुमजली पुल बांधण्यासाठी तत्वतः मान्यता दिली आहे. नवीन पुलासाठी 250 कोटींचा खर्च येणार असून तो उभारण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील ऐतिहासिक असलेल्या अमृतांजन पुलाप्रमाणेच हा उड्डाणपूल देखील लॉक डाऊन मध्ये पाडला जाणे शक्य आहे. तर टाटा कंपनीने संपूर्ण पुल पाडून पुन्हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागू शकतो, असे सांगितले आहे.