मुंबई : निवडणूक आयोगाकडून मोठी बातमी आली आहे. कोरोनामुळे विधान परिषदेच्या 9 जागांसाठी रखडलेल्या निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतचा प्रस्ताव टाकला होता. यावर आता निवडणूक आयोगानेही हालचाल केली आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 9 जागांवर निवडणुका घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील 9 विधानपरिषद जागांवर प्रलंबित असलेल्या निवडणुकांशी संबंधित बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राच्या मुद्यावर निवडणूक आयोगाची दिल्लीत मोठी बैठक सुरू होती. या बैठकीत अमेरिकेवरून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त सामील झाले होते. दोन्ही निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगात हजर होते.
या बैठकीत महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली. खरंतर, उद्धव ठाकरे 28 मे पर्यंत आमदार झाले नाहीत तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात होती.
दरम्यान, विधानपरिषदेच्या या 9 जागांसाठी 27 मे रोजी निवडणूक होईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.