गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि राज्यामध्ये कोरोनाची बिकट परिस्थिती निर्मण झाली आहे, त्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर असं समजतय की राज्य सरकार ही परिस्थिती हाताळू शकत नाही, हे चित्र आता स्पष्ट झालं आहे, दिवसेंदिवस मुंबई आणि राज्यातल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सोबतच मृत्यूंची आकडेवारीही वाढत चालली आहे, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, हे सांगण्यासाठी मी राज्यपालांकडे आलो होतो.
काही रुग्णांचा रुग्णालयाच्या समोरच मृत्यू होत आहे, त्यांच्यावर उपचारदेखील केले जात नाहीत, त्यामुळे राज्यातली अनेक रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत अशी मागणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या कोरना परिस्थितीला सांभाळताना राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. कोरोनाशी लढण्याची क्षमता सध्याच्या सरकारमध्ये नाही. त्यांना नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, जेणेकरून राज्यातली परिस्थिती सुधारेल असे मत नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले आहे.
लोकांचा जीव वाचवायला सरकार सक्षम नाही. आतापर्यंत केंद्र सरकारनेच सगळी मदत केली आहे. सरकारचा या परिस्थितीला घेऊन अभ्यास नाही. आताचे राज्य सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाही, ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी सरकारची स्थिती झाली आहे, कोकणातील स्थितीही चिंताजनक आहे. त्यामुळे राज्य सरकार ही परिस्थिती हाताळू शकत नाही, असा निष्कर्ष काढून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी विनंती मी राज्यपालांकडे केली असल्याची माहिती नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली आहे.