कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष सुविधा सुरू केली आहे. यानुसार आता, बीपीसीएलचे ग्राहक व्हॉट्सॲपवरून घरगुती गॅस बुकिंग करू शकणार आहेत. याबाबत बीपीसीएलकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, देशभरातील बीपीसीएलचे ग्राहक आता व्हॉट्सॲप वरून कोठूनही स्वयंपाकासाठीचा गॅस सिलेंडर (Cooking Gas Cylinder) बुक करू शकतील.
बीपीसीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड ही कंपनी देशातील दुसऱ्या क्रमांकाची वितरण कंपनी आहे. आमचे 7.10 कोटी ग्राहक असून या सर्वांना या सुविधेचा फायदा होणार आहे. या बुकिंगसाठी कंपनीकडून 1800 224 344 हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.
ग्राहकाला आपल्या अधिकृत नंबर वरून या नंबर वर बुकिंग करावे लागेल. व्हाट्स ॲपवरून बुकिंग (Cylinder Booking on WhatsApp) केल्यानंतर ग्राहकांना बुकिंगचा मेसेज मिळेल, त्यासोबत एक लिंक देखील मिळेल. ज्यावर ते डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, यूआयपी आणि ॲमेझॉन सारख्या इतर ॲप द्वारे पैसे भरू शकतील, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.