पुणे : कोरोना संसर्गाची साखळी तुटावी याकरिता गेले पाच दिवस बंद असलेला गुलटेकडी मार्केटयार्ड येथील गूळ भुसार विभाग सोमवारपासून पूर्ववत सुरु होईल, असे मर्चंट्स चेबर्सचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी कळविले आहे.
गूळ भुसार विभागातील 15 व्यापारी गेल्या आठवड्यात कोरोना संसर्गाने बाधित झाले. त्याकारणाने व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी गूळ भुसार विभागातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.पणन संचालक सुनील पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जी.देशमुख आणि मर्चंट्स चेंबर्सचे पदाधिकारी यांची एकत्र बैठक झाली आणि यार्डातील सुविधांबाबत चर्चा झाली. त्यावेळी मार्केट यार्डात निर्जतुकीकरण, हँड सॅनिटायझरची व्यवस्था आणि थर्मल गन या सुविधा बाजार समितीने दिल्याचे निदर्शनास आले.कोरोनाबाधित क्षेत्रातून येणाऱ्या लोकांना प्रतिबंध करण्याचा निर्णयही झाला. त्यानंतर येत्या सोमवारपासून गूळ भुसार विभाग चालू करण्याचे ठरले. संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत.