मुंबई : पुण्यासह ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील मद्यप्रेमींना खुश करणारी बातमी समोर आली आहे. ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यात उद्यापासून मद्य विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी यासंदर्भात माहिती दिली.
‘कोरोना’चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह 14 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये आहेत. सुरुवातीला केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य विक्रीला सशर्त परवानगी होती, मात्र आता ग्रीन, ऑरेंज आणि रेड या तिन्ही झोनमध्ये, बाजारपेठा आणि मॉलमध्ये नसलेल्या अशा स्वतंत्र मद्यविक्री दुकानांना परवानगी मिळाली आहे.
मद्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखावे लागणार आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात नसतील, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र ) तूर्तास मद्यविक्रीला अजिबात परवानगी नाही. प्रत्येक लेनमध्ये फक्त पाच दुकाने (जीवनावश्यक दुकाने वगळता) उघडली जाऊ शकतात. जीवनावश्यक दुकानांच्या संख्येवर मात्र बंधन नाही.