औरंगाबाद : शहरावरील कोरोना विषाणूचे दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आज सकाळी शहरात आणखी १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने औरंगाबादमधील कोरोना बाधितांचा आकडा आता २७३ वर गेल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
शहरातील विविध भागांमध्ये आता कोरोनाचे बाधित रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाने शहरावरील मगरमिठी अधिक घट्ट केल्याचे संकेत मिळत आहेत. आज सकाळी आढळून आलेल्या कोरोना बधितांमध्ये शहरातील मुकुंदवाडी येथील तब्बल १६ नागरिक कोरोना बाधित असल्याचे आढळून आले असून १ जण बायजीपुरा येथील नागरिक असल्याची माहितीही डॉ. येळीकर यांनी दिली.
शनिवारी रात्री बाराच्या सुमारास आणखी १२ रुग्ण आढळून आले. त्यात जयभीमनगर घाटी येथील ११ जण तर नंदनवन कॉलनी वसाहतीतील १ नागरिकाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे रात्रीच २१६ वरून बाधितांची संख्या ४० ने वाढून २५६ वर पोहोचली होती.. त्यानंतर आज सकाळी पुन्हा १७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात आता मुकुंदवाडी आणि जयभीमनगर घाटी हे नवे हॉटस्पॉट निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता शहरातील बाधितांची संख्या २७३ वर झेपावल्याने शहराच्या चिंतेत आता आणखी भर पडली आहे.