मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर या दोघांमध्ये तब्बल 20 मिनिट चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या नियुक्ती बाबत चर्चा झाली की नाही हे माहित नाही. पण ही भेट असतानाच दिल्लीत निवडणूक आयोगाची बैठक पार पडली.
या बैठकीच्या काही वेळानंतरचं दिल्लीतून उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारे वृत्त समोर आले. निवडणूक आयोगाने राज्यपालांच्या प्रस्तावाचा विचार करत महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रखडलेल्या निवडणुका होणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्ण्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला होता. कारण कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला आता 28 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. जर या मुदतीच्या आत निवडणूक झाली नसती तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असता.
मात्र निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. तर शिवसेना खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील रखडलेल्या विधान परिषद निवडणूका घेण्यास परवानगी दिली आहे. या मुळे राज्यात निर्माण झालेले राजकीय अनिश्चितेच्या वातावरणाचा धुरळा खाली बसेल.महाराष्ट्राची पुण्याई मोठी म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला. केंद्र सरकारचे आभार ! असे संजय राऊत म्हणाले आहेत.