‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ आणि आदेश बांदेकर हे समीकरण झाले आहे, तर आदेशभावोजी हे अल्पावधीतच प्रत्येक मराठी कुटुंबातील सदस्य बनले आहेत. लॉकडाऊन मध्ये आता भावोजी होम मिनिस्टर घरच्याघरी या कार्यक्रमातून तमाम वहिनींना घर बसल्या पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून देणार आहेत. हा कार्यक्रम ८ जून पासून संध्याकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यानिमित्ताने आदेश बांदेकर यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद
१. होम मिनिस्टर घरच्याघरी या कार्यक्रमा बद्दल तुम्ही काय सांगाल?
– सध्या लॉकडाऊनमुळे सगळे जण वर्फ फ्रॉम होम करत आहेत आणि ‘वर्फ फ्रॉम होम’ या प्रकारातच होम मिनिस्टर घरच्याघरी या कार्यक्रमाचं शूटिंग सुरू झालं आहे. व्हिडीओ कॉलद्वारे मी यात वहिनींशी संपर्क साधणार आहे आणि त्यांच्या कुटुंबियांशी गप्पा मारणार आहे. घर बसल्या वहिनींना पैठणी जिंकण्याची संधी मिळेल.
२. होम मिनिस्टर आता पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्या बद्दल प्रेक्षकांना काय सांगाल?
– सध्या सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे. अशा अवस्थेमध्ये होम मिनिस्टर सगळीकडे आनंद पसरविणार आहे.
३. घरून शूट करण्याचा अनुभव कसा आहे?
– आधी एका वेळेला फक्त एकाच कुटुंबामध्ये जाता येत होते. आता लॉकडाऊनमुळे कुटुंबाच्या अनेक सदस्यांना भेटता येत आहे. आता सगळे आपापल्या घरात आहेत. आता मी माझ्या घरातून थेट सगळ्या घरात फिरून येत आहे.
४. होम मिनिस्टर या कार्यक्रमाने १६ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आणि तुम्ही या प्रवासाचे प्रमुख साक्षीदार आहात त्याबद्दल तुम्ही काय भावना व्यक्त कराल?
– सुरुवातीला होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे १३ भाग करायचे होते पण १३ भाग करताना १६ वर्षे कधी झाली हे कळलेच नाही. माझ्या आयुष्यातील सर्व स्वप्नांची पूर्ती ही ‘झी मराठी’मुळेच झाली आहे. ‘झी मराठी’मुळे आदेश बांदेकर नावाचा मराठमोळा ब्रँड तयार झाला. त्यामुळे मी कायम ‘झी मराठी’ आणि समस्त मराठीजनांच्या ऋणात राहणे पसंत करेन.