चीनकडून भारतीय जवानांवर हल्ला केल्यानंतर संपुर्णदेशांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे, त्यातच देशातील अनेक नागरिकांनी अनेक चिनी वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णयही घेतला मात्र यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलताना दिसत नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
चीनच्या सैनिकांनी दगाबाजी करून भारतीय सैनिकांवर हल्ला केला. यात 20 भारतीय जवान शाहिद झाले. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, मात्र पंतप्रधान यावर का बोलत नाहीत, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. दोन दिवसात यावर बोलले नाही तर आम्ही या प्रकरणातील सत्यता पुढे आणू, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत बहुमत आहे, याचा अर्थ ते या देशाचे राजे झाले, मनाप्रमाणे वागतील आणि राज्य करतील असं नाही. त्यांनी भौगोलिक राजकारण समजून घ्यावं, उगाच कुणाशी मैत्री आणि उगाच कुणाशी शत्रुत्व घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सैन्याचा बळी द्यायचा, हा जो खेळ चालला आहे, हा खेळ थांबला पाहिजे अशी विनंती मी भारत सरकारला करतो, असंही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.