पुणे | थिएटरचा मंच सोडून राजकारणाचा मंच गाजवण्यासाठी अभिनेत्री प्रिया बेर्डे सज्ज झाल्या आहेत. येत्या 7 जुलै रोजी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.
पुणे शहर बेर्डे कुटुंबियांसाठी खूप महत्त्वाचं राहिलं आहे. किंबहुना आमच्या आयुष्यावर पुण्याचा खूप मोठा प्रभाव आहे. मला बॅकस्टेज कलाकारांसाठी चांगलं काम करण्याची इच्छा आहे. माझ्या कामाने त्यांच्या प्रश्न सुटले पाहिजेत, असं सारखं वाटतं. त्यामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच या कामात मला शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरेल, असंही त्या म्हणाल्या आहेत.
प्रिया बेर्डे यांच्यासोबत चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार-तंत्रज्ञ देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामध्ये सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर, जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचा समावेश आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांनी बेर्डे यांच्या पक्षप्रवेशावर समाधान व्यक्त केले आहे. त्यांना करायच्या असलेल्या कामासाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी योग्य पक्ष निवडल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. तसंच त्यांना करायचं असलेल्या कामामागे पक्ष हिमतीने आणि ताकदीने उभा राहील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले आहेत.