कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित रहावा यासाठी लढा देणारे ‘मराठी आरमार प्रमुख’, दर्या सारंग, ‘सरखेल’ कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाबाबत आपण परिचित आहातच. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कान्होजी यांच्यावर सागरी सुरक्षेची जाबाबदारी दिली होती. हि जबाबदारी चोख बजावत कान्होजी यांनी कोकणातील एक-एक किल्ले ताब्यात घेत मोगलांचे स्वप्न धुळीस मिळविले होते. 16 व्या शतकात त्यांनी हा पराक्रम केला होता. त्यानंतर आता 21 व्या शतकातही शिवरायांचा मावळा निनाद पाटील दर्यावर राज करायला आला आहे.त्याने या सागरात पोहून तब्बल 100 वेळा सागरी परिक्रमा पूर्ण केली आहे. अशी सागरी परिक्रमा पूर्ण करण्या मागचा त्याचा उद्देश्य हा जवळपास कान्होजी यांच्या सारखाच आहे. फक्त काळानुरुप त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. कान्होजी यांनी किल्ले ताब्यात घेण्यासाठी हा पराक्रम केला होता तर या मावळ्याने ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन व पावित्र्य राखण्यासाठी ही शतकीय परिक्रमा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे.
मुंबई पोलीस दलातील निनाद पाटील याने गेल्या वर्षी 6 जूनच्या शिवराज्याभिषेक दिनी सागरी परिक्रमेला सुरुवात केली होती. त्यांनतर हा परिक्रमाचा प्रवास सुरूच झाला. या दरम्यान परिक्रमाच्या माध्यमातून निनाद गड किल्ले संवर्धन व स्वच्छतेबाबत सामाजिक संदेश देत गेला. दरम्यान हा परिक्रमाचा प्रवास शंभराव्या टप्प्यात पोहोचला होता.या शंभराव्या परिक्रमेसाठी निनाद यांनी ऐतिहासिक अशा 13 जुलै 1660 रोजी पावनखिंडीतील रणसंग्रामाला 360 वर्ष पूर्ण होत असलेला दिवस निवडला होता. या दिवशी समुद्राला उधाण आले असतांना देखील निनाद पाटील याने समुद्रात उडी घातली. बेसुमार लाटांचा मारा होत असतानाही, त्या लाटांना मावळ्याची ताकद दाखवत अर्नाळा ते अर्नाळा किल्ला असा दीड किलोमीटर समुद्री मार्ग पोहून शतकीय परिक्रमा पूर्ण केली. हि परिक्रमा पूर्ण करत अर्नाळा किल्यावर जाऊन विजयी झेंडा फडकावला.तसेच हि परिक्रमा बांदल सेना आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या घोडखिंडीतील लढाईला समर्पित करत, छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
विशेष म्हणजे कान्होजी जेव्हा सागरी सुरक्षेची जबाबदारी हाताळत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या कर्तृत्व आणि पराक्रमाद्वारे सागरी किनाऱ्यावरील अनेक किलेले ताब्यात घेतले होते. त्यामुळे त्यावेळी इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज हे सगळे कान्होजी आंग्रे यांचा पराभव करण्यासाठी एकत्र जमले होते. सद्यस्थितीत निनाद पाटील यांच्या बाबतीतहि असेच काहीसे प्रकरण आहे. मात्र त्यांना लढा स्वकीयांबाबत द्यावा लागत आहे. कारणं सद्यस्थितीत गड किल्ल्याची दुरावस्था झाली आहे किल्ल्यावर कुणीही येऊन पवित्र अशा स्थळी अश्लील चाळे करत आहे.तसेच दर वर्षाला लाखोंच्या वर दारूच्या बाटल्यांचा खच स्वच्छता अभियान राबवणाऱ्या सामाजिक संस्थांच्या हाती लागतो.त्यामुळे ज्या किल्ल्याना मिळवण्यासाठी शिवरायांच्या मावळ्यांनी जी आहुती दिली, त्या आहुतीचा कुठेतरी अपमान होत आहे. त्यामुळे या सर्व किल्ल्याचे महत्व टिकून रहाव, किल्ल्याचे दुर्ग संवर्धन, स्वच्छता राखावी या बाबतची जागृती जनमानसात व्हावी यासाठी निनाद पाटील याने हि शतकीय परिक्रमा पूर्ण केली आहे. शेवट इतकाच कि, निनाद पाटील यांनी केलेली हि सागरी परिक्रमा शिवरायांच्या मावळ्या सारखीच आहे. त्यामुळे एखाद्या बलाढ्य मावळ्याप्रमाणे शतकीय परिक्रमा पूर्ण करून त्यांनी जी जनजागृती करण्याचा नागरिकापर्यंत प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न सफल व्हावा इतकच.