नुकताच दृश्यम २ हा चित्रपट रिलीज झाला. आणि त्या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. फक्त डायलॉगच नाही तर जबरदस्त दृश्यांवर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चित्रपट म्हणजे दृश्यम २ हा चित्रपट. एकापेक्षा एक ट्विस्ट, सीन्सचा थरार, जबरदस्त क्लायमॅक्स, सस्पेन्स या जोरावर या चित्रपटाने लक्ष वेधून घेतलंय. २०१३ मध्ये आलेल्या मल्याळम फिल्म ‘दृश्यम’चा रिमेक निशिकांत कामत यांनी आणला होता. त्या दृश्यमला मिळालेल्या यशानंतर आता त्याचा दुसरा भाग ‘दृश्यम २’ प्रदर्शित झालाय. अभिषेक पाठक यांचं दिग्दर्शन असलेला हा दुसरा भाग देखील मल्याळम चित्रपटाचा रिमेक असून त्याला अधिक रंजक करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी यासंदर्भातच फेसबुकवर एक पोस्ट टाकत हिंदी आणि मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ते आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणालेत पाहुयात….
“दृश्यम २ सारखा चित्रपट कदाचित १० वर्षातून एकदाच प्रदर्शित होतो. असा म्हणायला काही हरकत नाही, कारण कथा, संपेन्स आणि त्याला साजेस असा अभिनय खरंच…! शब्द नाहीयेत दृश्यम २ चं कौतुक करायला. जो काही मागच्या दिवसापासूनचा साऊथचा वाढता पगडा आणि त्यावरून होणारे रडगाणे त्याच्यासाठी खरंच ही मोठी शिकवण आहे. काल पुण्यात दृश्यम २ चे तिकीट मिळणं सुद्धा अवघड होतं. दृश्यम २ ला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद, त्यावरून पुन्हा एकदा लक्षात येतं की जे कुणी मराठी निर्माते, कलाकार आणि दिग्दर्शक, मराठी प्रेक्षकांच्या नावाने बोंब मारतात की मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांना साथ देत नाहीत, दुसरी गोष्ट सध्या या चालू वर्षामध्ये अनेक हिंदी बिग बजेट असलेले सिनेमे बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात आपटताना दिसले. त्यावेळी सुद्धा हिंदी निर्मात्यांनी हीच बोंब मारली की महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्ग गेला कुठे आणि तो दाक्षिणात्य सिनेमांकडे वळत आहे वगैरे वगैरे. अशा हिंदी आणि मराठी निर्मात्यांना हेच सांगणं आहे की तुमच्या चित्रपटाची कथा, मांडणी आणि तांत्रिक बाबी जर भक्कम असतील तर प्रेक्षकांना सांगायची गरज पडत नाही, महाराष्ट्रातील प्रेक्षक हा तेवढा सुज्ञ आहे.”
पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “प्रत्येकवेळी निर्मात्यांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना जबाबदार धरणे योग्य नाही. याचं एकच उदहारण म्हणजे दृश्यम २ चित्रपट. माझं हिंदी, मराठी निर्माते आणि दिग्दर्शकांना एवढंच म्हणणं आहे की, जे जे काही दोन्ही भाषेतील सिनेमे आपटलेत त्यांनी खरंच त्यांच्याच घरातल्या किमान १० लोकांना तो चित्रपट दाखवावा आणि नंतर प्रेक्षकांकडून अशा अपेक्षा कराव्यात..! शेवटी इतकंच सांगेल की दृश्यम २ नक्की बघा..! आज कै. निशिकांत कामत यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही ..”