पुणे: पुणे महापालिका हद्दीतील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करा आणि दंड वसूल करा, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरांतर्गत येणार्या विविध क्षेत्रिय कार्यालयाकडून विविध ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केली जाते. परंतू जेव्हा बोपोडी, औंध रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भाऊपाटील रोड सर्वत्र अनधिकृत जाहिरात फलकांचे जाळे पसरले असताना देखील कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे.
व्यावसायिक फलक आणि त्यापाठोपाठ उगवणारे राजकीय नेत्यांचे वाढदिवस आणि विविध शुभेच्छांचे फलक यातून बोपोडी औंधरोड, औंध, भाऊपाटील रोड विद्रुपीकरणच सुरू आहे. असे जाहिरात फलक हे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत असला, तरी बहुतांशवेळा परवानगी न घेताच फलकबाजी केली जाते. त्यामुळे महसूल बुडत आहे. शहराचे विद्रुपीकरणही मोठ्या प्रमाणात होत आहे.
पुणे महापालिकेने अनधिकृत जाहिरातबाजीला अटकाव करण्यासाठी धोरण स्वीकारले असले तरी अनधिकृत फलकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कारवाई केवळ कागदावरच दिसत आहे. विविध परिसरात अनधिकृत फलक सुमारे महिनो महिने एकाच ठिकाणी दिसतात तरीदेखील महापालिका प्रशासन व अतिक्रमण विभागाकडून कारवाईकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आकाशचिन्ह विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. त्यावेळी कारवाई करा आणि दंड वसूल करा, असे आदेश त्यांनी आकाशचिन्ह आणि परवाना तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्यांना दिले होते.
बोापोडी येथून पुणे महापालिकेची हद सुरु होते. पुणे शहराच्या प्रवेशद्वारापासून सुरू असलेली फुकटची जाहिरातबाजी आता गल्लीबोळात पोहोचली आहे. अधिकृत आणि अनधिकृत जाहिरातींमुळे शहराच्या होत असलेल्या विद्रुपीकरणाबरोबरच खराब झालेल्या डिजिटल फ्लेक्समुळे प्लास्टिक कचर्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही प्लास्टिक कचर्याची वाढ पर्यावरणाला घातक ठरत आहे.
कितेक महिन्यापसून प्रशासनाने एकाही अनधिकृत होर्डिंग, फलकांवर कारवाई केलेली दिसत नाही. त्यामुळे सर्व होर्डिंग्ज अधिकृत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.तसेच सदर अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई का केली नाही जात, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.