पुणे, 21 नोव्हेंबर 2022: पुणे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात सावरकर पुतळा, सारसबाग येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यपालांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या विरोधात केलेल्या अयोग्य वक्तव्यामुळे हा निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, राज्यपालपद भूषविणाऱ्या व्यक्तीने संबंधित राज्यातील संस्कृती आणि लोकांचा आदर करणे अपेक्षित असते. परंतु विद्यमान राज्यपाल वारंवार महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील माननीय व्यक्तींबद्दल अवमानकारक वक्तव्य करत असल्याचे दिसून येत आहे.
जगताप यांच्या म्हणण्यानुसार, कोश्यारी त्यांच्या पूर्वीच्या पक्षाचा महाराष्ट्रद्वेषी अजेंडा राबवत आहेत.
ते म्हणाले, "राज्यपाल वारंवार महाराष्ट्राचा अपमान करत आहेत आणि त्यांना भारतीय जनता पक्ष (भाजप) प्रोत्साहन देत आहे."
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितल्याचे अपमानास्पद विधान केले. या विधानाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले.
"आम्ही भाजपसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करत आहोत." शिवरायांचा अवमान म्हणजे भाजपचे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोपही राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केला.
निदर्शनात “छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी” अशा घोषणा सोबत “भगतसिंग कोश्यारी; ‘नई चलेगी होशियारी’, ‘काळे मन हे भाजपचे अंतरंग आहे’, ‘राज्यपाल हटवा आणि महाराष्ट्र वाचवा’ अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संतोष नांगरे, प्रिया गडदे, किशोर कांबळे, वनराज आंदेकर, महेश शिंदे, बाबा पाटील, मृणालिनी वाणी, श्वेता होनराव, पार्थ मिठकरी, गणेश मोहिते, मनाली भिलारे, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.