मेस्सीचं स्वप्न साकार! फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिना विजयी, पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने फ्रान्सवर मात

मेस्सीचं स्वप्न साकार! फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिना विजयी, पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने फ्रान्सवर मात


ARG vs FRA, Fifa World Cup 2022 Final : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या (Fifa WC) अंतिम सामन्यात (Fifa World Cup 2022 Final) फुटबॉल इतिहासातील एक सर्वात रोमहर्षक असा सामना पाहायला मिळाला. आधी अतिरिक्त वेळ त्यानंतर पेनल्टी शूटआऊट असं सारंकाही असणाऱ्या या सामन्यात पेनल्टी शूटआऊट झालं. ज्यामध्ये अर्जेंटिना संघाने फ्रान्सवर 4-2 (France vs Argentina) असा विजय मिळवत वर्ल्ड कप जिंकला आहे. विशेष म्हणजे ज्या मेस्सीसाठी (Lionel Messi) अर्जेंटिनाला हा कप जिंकायचा होता, त्या मेस्सीनेच सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. पेनल्टी शूटआऊटमधील गोल पकडून एकून तीन गोल मेस्सीनं केले. विशेष म्हणजे अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलानो मार्टिनेज (Emiliano Martinez) याने उत्कृष्ट खेळ दाखवत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी निभावली. 


सामन्यात सुरुवातीपासून अर्जेंटिना संघाने आपला दबदबा ठेवला होता. अगदी सुरुवातीच्या काही मिनिटांपासून त्यांनी फ्रान्सवर आक्रमणं करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर 23 व्या मिनिटाला फ्रान्सच्या चूकीमुळं अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. मेस्सीनं ही पेनल्टी घेताना कोणतीही चूक न करता गोल करत अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर संघाचा अनुभवी आणि स्टार खेळाडू एन्जल डी मारिया याने 36 व्या मिनिटाला अप्रतिम असा गोल करत अर्जेंटिनाची आघाडी 2-0 केली. हाल्फ टाईमनंतर 79 मिनिटांपर्यंत ही आघाडी कायम होती, ज्यामुळे अर्जेंटिना सहज सामना जिंकेल असंच वाटू लागलं होतं.
79 मिनिटांपर्यंत 2-0 अशा आघाडीवर असणाऱ्या अर्जेंटिनाचा विजय होईलच असं वाटत असताना 24 वर्षीय स्टार फुटबॉलपटू कायलिन एम्बाप्पे याने 80 व्या मिनिटाला पेनल्टीच्या मदतीनं गोल करत फ्रान्सच्या आशा जिवंत केल्या. त्यानंतर लगेचच 81 व्या मिनिटाला एम्बाप्पेनं आणखी एक उत्कृष्ट गोल करत सामन्यात बरोबरी साधली... आणि बघता बघता सामना पलटू लागला...90 मिनिटं झाली काही मिनिटं अधिकची दिली गेली पण दोन्ही संघाना गोल करता आला नाही आणि सामन्यात एक्स्ट्रा टाईम देण्यात आला...
अतिरिक्त वेळेत 108 व्या मिनिटाला लिओनल मेस्सीनं एक अप्रतिम असा गोल केला... गोल झाला तेव्हा मेस्सी ऑफसाईड होता असं वाटत होतं पण रेफरीनं नीट चेक केलं असता तो ऑफसाईड नव्हता, ज्यामुळे 108 व्या मिनिटीला अर्जेंटिनाचा तिसरा गोल झाला आणि आता तरी ते सामना जिंकतील असं वाटू लागलं. पण सामना अजून बाकी होता...एक्स्ट्रा टाईम संपायला 2 मिनिटं असताना अर्जेंटिना संघाच्या खेळाडूच्या हाताला बॉल गोलपोस्टजवळ लागला आणि त्यामुळे फ्रान्सला पेनल्टी मिळाली, जी एम्बाप्पेनं गोलमध्ये बदलत 3-3 अशी गोलसंख्या केली. ज्यामुळे अतिरिक्त वेळेनंतर पेनल्टी शूटआऊट खेळवण्यात आलं. ज्यामध्ये अर्जेंटिना संघाने 4-2 असा विजय मिळवत वर्ल्ड कप जिंकला. 
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook