पुणे : सामूहिक लग्न सोहळ्यामुळे गोर-गरिबांच्या पैशांची बचत होते. लग्न कार्यामध्ये होणारा नाहक खर्च कमी होतो. अप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ५४ जोडप्यांचा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे. सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये हुंड्या सारख्या प्रथा बंद होतात. अनिष्ट प्रथा-परंपरांना त्यामुळे फाटा दिला जातो, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट’चे आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष आणि केमिस्टरत्न जगन्नाथ शिंदे उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’तर्फे कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
जगन्नाथ शिंदे म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या वर्गणीवर हा सामूहिक विवाह सोहळा करण्यात आला आहे. आपण काम करताना माणसाला देव मानून समाजाला काही तरी देत जावे आणि त्यांची सेवा करावी, हीच यामागे भावना आहे. गरीब आणि आदिवासी समाजातील अनेक जोडपी येथे विवाहबद्ध झाली. त्यामुळे त्यांचा लग्नसोहळा आमच्या माध्यमातून होतो आहे, ही समाधानाची बाब आहे.
Tags:
Maharashtra