सरहदच्या गुजरवाडी शैक्षणिक संकुलात ‘विजय धर ॲम्फी थिएटर’चे उद्घाटन

सरहदच्या गुजरवाडी शैक्षणिक संकुलात ‘विजय धर ॲम्फी थिएटर’चे उद्घाटन



पुणे : शेजारी देशांनी काहीही केले, तरी काश्मिरी जनता त्यांना कधीच साथ देणार नाही. काश्मिरी जनतेचे देशसेवेत मोठे योगदान आहे. शेजारी देशांनी तिथे अराजक माजवले, हिंसाचार घडवला पण काश्मिरी जनतेने आपण देशाचा अविभाज्य भाग असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले. काश्मिरी जनतेच्या या प्रयत्नांना सरहदसारख्या संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काश्मीरसोबत सारा देश उभा आहे, हे सरहदने दाखवून दिले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे काढले.

काश्मीरमधील ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ विजय दुर्गाप्रसाद धर यांच्या नावाने सरहद ग्लोबल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘विजय धर ॲम्फी थिएटर’च्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सरहद संस्थेच्या कात्रज परिसरातील गुजरवाडी येथील शैक्षणिक संकुलात बुधवारी (दि. २४) हा कार्यक्रम झाला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विजय धर, त्यांच्या पत्नी कविता धर, कन्या कनिका धर, सरहद संस्थेचे संजय नहार, प्राचार्य सुषमा नहार, संतसिंग मोखा, विश्‍वस्त डॉ. शैलेश पगारिया, विश्‍वस्त शैलेश वाडेकर, आर्किटेक्ट इम्रान शेख, वसंत मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शरद पवार पुढे म्हणाले, पुण्याने देशाला नवा मार्ग दाखवण्याचे कार्य केले आहे. पुणे हे शिक्षण, उद्योग, संस्कृती, आयटी अशा अनेक क्षेत्रांतील आदर्श शहर आहे. देशातील जनतेला एकत्रित आणण्याचे कार्य याच पुण्यातून लोकमान्य टिळक यांनी केले. कार्याचे शतक पूर्ण केलेल्या अनेक संस्था पुण्यात आहेत. पंजाब एकेकाळी देशाचे धान्यकोठार होता. पंजाबचे योगदान लक्षणीय आहे. काश्मीरमधील परिस्थिती बराच काळ अस्थिर, अशांत आणि चिंताजनक होती. त्यामुळे शिक्षणक्षेत्राची हानी झाली होती. पण विजय धर तसेच सरहद सारख्या संस्थांनी सामाजिक दायित्व जाणून या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. काश्मीर हा भारताचा हीरा आहे. कुणी कितीही अराजक माजवण्याचा प्रयत्न केला, तरी काश्मीर आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि सदैव राहील. अशा काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्याचे प्रकल्प विजय धर आणि सरहद संस्थेच्या माध्यमातून संजय नहार यांनी कार्यान्वित केले आहेत. हे प्रयत्न आणि कार्य महत्त्वपूर्ण आहे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, विजय धर यांच्याशी माझा परिचय पवारसाहेबांनीच १९७४ च्या सुमारास करून दिला. तेव्हापासून विजय धर यांच्या विविध कार्याशी मी परिचित आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य काश्मीरमध्ये उभारले आहे. त्यांचे वडील दुर्गाप्रसादजी हे इंदिरा गांधी यांच्या काळात त्यांचे सल्लागार होते. स्वतः विजयजी हेही राजीव गांधी यांच्या कार्यकाळात सल्लागारपदी होते. विजयजींनी काश्मीरमध्ये उभारलेली शाळा व शैक्षणिक कार्य, सर्वोत्तम मानले जाते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सरहदने ॲम्फी थिएटर उभारले, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना, मी केंद्रीय गृहमंत्री होतो. तेव्हा काश्मीरमधील परिस्थिती आटोक्यात होती. आता ती बिघडली आहे. पहलगाम प्रकरण ताजे आहे. याला जबाबदार कोण, याचा विचार जनतेने केला पाहिजे.

विजय धर यांनी मनोगतात शरद पवार यांच्याशी असलेल्या स्नेहाचा उल्लेख केला. सुरवातीला पवार यांनी मला बारामतीला आमंत्रित केले आणि तिथे उभारलेले कार्य दाखवले होते. काश्मीरमध्ये प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न केला, त्याला सरहदच्या माध्यमातून संजय नहार यांनी साथ दिली, सहकार्य केले, असेही धर म्हणाले.

प्रास्ताविक करताना संजय नहार म्हणाले, विजय धर यांचे कार्य अनेक क्षेत्रांत आहे. त्यांनी शिक्षण, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामातून आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याची धुरा पुढे नेण्याचे आश्वासन, ही भावना ॲम्फी थिएटर उभारण्यामागे आहे. सरहद संस्थेच्या अनेक उपक्रमांसाठी शरद पवार तसेच सुशीलकुमार शिंदे यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याचा उल्लेख नहार यांनी केला.

नवकार मंत्र तसेच राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संतसिंग मोखा, वसंत मोरे, डॉ. शैलेश पगारिया यांनी स्वागत केले. गुजरवाडी शैक्षणिक संकुलासाठी कार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. लेशपाल जवळगे यांनी आभार मानले. नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले.
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook