मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाचे अधिकृत पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत हा चित्रपट साकारला आहे.
पोस्टरमध्ये रितेश देशमुख महाराजांच्या वेशात अत्यंत प्रभावी दिसत असून हातात भगवा ध्वज, चेहऱ्यावर करारी भाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीतील मांडणी महाराजांच्या शौर्याची प्रचिती देते. सुवर्ण अक्षरांतील शीर्षक आणि प्रकाशयोजनेतून चित्रपटाची भव्यता अधोरेखित होते.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ हा द्विभाषिक (मराठी व हिंदी) ऐतिहासिक ॲक्शन-ड्रामा असून स्वराज्य स्थापनेचा अद्वितीय प्रवास, त्याग, दूरदृष्टी आणि शौर्य यांचा सशक्त सिनेमॅटिक आविष्कार यातून मांडला जाणार आहे. अन्यायाविरुद्ध लढत स्वराज्याच्या स्थापनेची गाथा या चित्रपटातून उलगडणार आहे.
या चित्रपटात मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भक्कम फौज पाहायला मिळणार आहे. संगीत अजय-अतुल यांचे असून प्रसिद्ध छायाचित्रकार संतोष सिवन मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. उत्कृष्ट अभिनय, भव्य दृश्यात्मक मांडणी आणि सांस्कृतिक अभिमानाचा अनुभव देणारी ही कलाकृती ठरणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले.
निर्माते ज्योती देशपांडे आणि जिनिलीया रितेश देशमुख यांच्या निर्मितीत, रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी ‘महाराष्ट्र दिना’च्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. स्वराज्याच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Tags:
Entertainment