मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. लवकरच उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोठ्यातून विधानपरिषदेवर नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘सरकारनामा’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नेमणूक होण्यावरून निर्माण झालेला पेच लवकरच सुटण्याची शक्यता आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ठाकरे यांच्या नियुक्तीला लवकरच मान्यता देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थात ही घोषणा कधी होईल, याबद्दलची तारीख सांगण्यास या सूत्रांनी असमर्थता व्यक्त केली.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर सदस्य म्हणून तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती.
या वेळी राज्यपालांनी आडवळणाने उद्धव यांची नियुक्ती करणे कसे अवघड आहे, हे सांगितले होते. याबाबतीत राज्याचे ॲडव्होकेट जनरल आणि केंद्रीय गृहमंत्रालय यांच्याकडे विचारणा करावी लागेल आणि सरकारचा हा प्रस्ताव निकषात बसतो की नाही हे तपासून पाहावे लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.