आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधला. कोरोनाचा साखळदंड तोडण्यासाठी आपल्या एकजुटीची साखळी मजबूत करायला हवी, घरी राहून हे युद्ध आरामात जिंकू, आजपर्यंत जसं सहकार्य केलं, तसंच यापुढेही करा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, शरद पवार, राज यांच्याशी मी बोलतोयच, शिवाय मालेगावातील मुल्ला मौलवींशी बोलतोय, हा व्हायरस जात पात पाहात नाही, याचा मुकाबला एकत्रितपणे करावा लागेल. असं ही ते यावेळी म्हणाले.
वांद्रे येथील झालेल्या मजुरांच्या आंदोलांविषयी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, वांद्र्यातील गर्दी हे कुणीतरी रेल्वेबाबत पिल्लू सोडल्यामुळे झाली आहे, तुम्ही माझ्या महाराष्ट्रात आहात, सुरक्षित आहात, माझं केंद्र सरकारशी बोलणं सुरु आहे, तुम्ही अजिबात काळजी करु नका. गोरगरीब मजुरांच्या भावनांशी खेळू नका, त्याचं राजकारण करु नका, हे संकट सर्वांसमोर आहे, त्याचा सामना सर्वांनी करु, गैरसमजाचं पिल्लू सोडू नका, आगीचे बंब बरेच आहेत, सर्वपक्षीय नेते हातात हात घालून लढत आहेत.
तुम्हाला घरात बंद करण्यात आम्हाला आनंद नाही, थोडा संयम ठेवा. २-४ दिवसांपूर्वी वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांना आवाहन केलं होतं, मला अभिमान वाटतो आज सकाळपर्यंत २१ हजार लोक पुढे आले आहेत, त्यांची छाननी सुरु आहे. त्यांना कुठल्या विभागात टाकायचं यांच्यावरही काम सुरु आहे. असं ही ते यावेळी म्हणाले. आदिवासी भागात पावसाळ्यात काहीच मिळत नाही, दुर्गम भागात सुविधा पोहोचवण्याची तयारी आजपासूनच, कोरोनाविरुद्ध लढाई आहेच, पण दुर्गम भागात आतापासून मदत गरजेची ! असेही ते म्हणाले. तसेच सर्वात प्रथम त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करताना भीम सैनिकांना विशेष धन्यवाद मानले.
मला अभिमान वाटतो, महाराष्ट्राने प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि ईसीजी व्हॅक्सिन याबाबत प्रयोग करण्याची परवानगी केंद्राकडे मागितली, उद्या महाराष्ट्र देशाला नव्हे तर जगाला दिशा देईल. कोरोना विषाणू महाराष्ट्रातून हद्दपार करायचा आहे, मुंबई-पुणे यासारख्या शहरात अधिक खबरदारी आहे, घरोघरी जाऊन चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत, पॉझिटिव्ह सापडणाऱ्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करतोय. डॉ रघुनाथ माशेलकर, विजय केळकर, दीपक पारेख यासारख्या तज्ज्ञांची एक समिती केली आहे. कोरोनानंतर आर्थिक संकट असेल, त्याविरुद्धची तयारी सुरु झाली आहे, यासाठी अजित पवारांच्या नेतृत्त्वात समिती केली आहे
देशात इतर कुठे झाल्या नाहीत इतक्या कोरोना चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत, महाराष्ट्र सरकार खंबीर आहे, धैर्याने मुकाबला करत आहोत. मी आज दोघांशी बोललो, सहा महिन्याच्या बाळाच्या आईशी बोललो, या चिमुकल्या योद्ध्याने कोरोनावर मात केली आहे. ८३ वर्षीय आजींशी बोललो, त्यांनीही कोरोनावर मात केली, म्हणजे कोरोनावर मात करता येते असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद सादताना बोलले आहेत.