मुंबईतील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोना विषाणूनं पाश आवळायला सुरुवात केली आहे. धारावीत नुकताच कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. बालिगा नगरमधील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला होता. रविवारी या भागात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे या परिसरात कोरोना विषाणूच्या रुग्णांचा आकडा हा पाचवर पोहोचला आहे. २१ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.
आतापर्यंत धारावीत अडीच हजार लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. एकट्या बालिगा नगरमधून हाय रिस्क असलेले १३२ ज्येष्ठ नागरिक आणि ३२ आजारी व्यक्तींच्या स्त्राव चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हाफकिन इन्स्टिट्यूडमध्ये हे स्त्राव नमुने पाठवण्यात आले आहेत, या चाचण्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.