राज्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा ६९० वर पोहोचला आहे, तर पुण्यात आज कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रविवार दुपारपर्यंत विषाणू बाधित ५५ नवे रुग्ण समोर आले आहेत त्यामुळे हा आकडा ६३५ वरुन ६९० वर पोहोचला आहे. ५५ पैकी २९ रुग्ण मुंबईत, १७ पुण्यात, ४ पिंपरी- चिंचवड, प्रत्येकी दोन रुग्ण हे औरंगाबाद आणि अहमदनगरमधले आहेत. तर आज पुण्यात ६० वर्षीय महिलेचा आणि ५२ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४ वर पोहोचली आहे.
राज्यात मुंबई आणि पुणेमध्ये विषाणू बाधितांचा आकडा हा वाढत चालला आहे. मुंबई हे कोरोना विषाणूचं हॉटस्पॉट बनलं आहे. एकट्या मुंबईत शनिवारी दिवसाअखेरपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा हा ३३० वर पोहोचला होता.
तर गेल्या १२ तासांत देशात कोरोना विषाणू बाधित ३०२ नवे रुग्ण आढळले. बारा तासांत वाढलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे देशात कोरोना बाधितांचा आकडा हा ३ हजार ३७४ वर पोहोचला आहे. या आकड्यामध्ये बरे झालेल्या आणि डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांचाही समावेश आहे. आतापर्यंत बाधितांपैकी २६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ७७ लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
Tags:
Pune