मुंबई : ‘कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या रोज देशाच्या काळजीत भर घालत आहे. मुंबई-पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय. या दोन्ही शहरांतील स्थिती गंभीर आहे. मुंबई-पुण्याला वाचवावे लागेल. वेळ आणीबाणीची आहे,’ असं शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून म्हटलं आहे.
वाचा काय आहे सामना’चा अग्रलेख
मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी – चिंचवड, नागपुरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंता वाढवीत आहे. नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा 70 च्या पार गेला आहे. याकडे नागपूरकर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनाही डोळेझाक करता येणार नाही. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या रोज देशाच्या काळजीत भर घालत आहे. मुंबई-पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय. या दोन्ही शहरांतील स्थिती गंभीर आहे. मुंबई-पुण्याला वाचवावे लागेल. वेळ आणीबाणीची आहे.
मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या तीन हजारांवर गेली आहे. हे काही चांगले लक्षण नाही. मुंबई पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांना हे आव्हान आहे. मुंबई हे काही साधे शहर नाही. मुंबईची महानगरपालिका म्हणजे एक स्वतंत्र राज्य आहे. त्यामुळे बजेटही एखाद्या राज्याच्या तुलनेत मोठे आहे. इकडे किंवा तिकडे कोरोना पॉझिटिव्ह झाले अशा बातम्या रोज मुंबईच्या भागा-भागांतून येत आहेत. आम्ही असेही ऐकले की, महापालिकेतर्फे ठिकठिकाणी संशयित रुग्णांना `क्वारंटाइन’ करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रिकाम्या इमारती, मैदाने, हॉटेल्स वगैरे ताब्यात घेऊन तेथे रुग्णांना ठेवले जात आहे. त्यातले काही रुग्ण बरे होऊन घरीदेखील जात आहेत. अशा रुग्णांचे टाळ्या वाजवून स्वागत वगैरे केले जात असले तरी झपाट्याने रुग्ण वाढ होणे हे काही चांगले लक्षण नाही. मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाली. इस्पितळातील डॉक्टर्स, नर्स यांनाही कोरोनाने ग्रासले आहे. मुंबईत संपूर्ण `लॉक डाऊन’ असतानाही सोमवारी काही ठिकाणी `ट्रॅफिक जाम’ होते याचा काय अर्थ घ्यायचा? इतके ट्रॅफिक जाम होत असताना पोलीस काय करीत होते? की ज्या असंख्य गाड्या रस्त्यावर उतरल्या त्या सगळ्या अत्यावश्यक सेवेतल्या होत्या? आपणच बेशिस्तीचे वर्तन करीत आहोत. मुंबई, पुणे, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका हद्दीत कोरोना वाढतो आहे व केंद्र सरकारने त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मुंबईत काही विपरीत घडू नये यासाठी मुख्यमंत्री शर्थ करीत आहेत. मुंबई महानगरपालिकेचे एक आपत्कालीन व्यवस्थापन आहे.
त्या व्यवस्थेला पार करून तीन हजारांवर कोरोनाग्रस्त दिसतात तेव्हा या संपूर्ण व्यवस्थेस कोठे गळती लागली आहे काय, याचा विचार करावा लागेल. महापालिका आयुक्त परदेशी यांनी संपूर्ण यंत्रणेचा फेरआढावा घेणे गरजेचे आहे व यंत्रणेत घुसलेले हवशे, नवशे आणि गवशे नक्की काय उलाढाल करीत आहेत ते तपासावे लागेल. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर `होम क्वारंटाइन’ झाल्या हेसुद्धा चिंताजनक आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत अशी अनेक आव्हाने परतवून लावली आहेत. इबोलापासून सार्स, डेंग्यू, मलेरियाशी महापालिकेने सामना केला आहे. अशा आरोग्य खात्यावर कोरोनामुळे कामाचा भार वाढला आहे हे खरे, पण मुंबईच्या रक्षणासाठी त्यांना कंबर कसावी लागेल. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा आदर्श याकामी सर्वच पालिका प्रशासनाने घ्यायला हवा. आरोग्यमंत्री मैदानात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत आहेत. आम्हाला त्यांचे कौतुक आहे. मुंबईचा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर मंडळींचा एक `टास्क फोर्स’ निर्माण केला आहे. या टास्क फोर्सची जबाबदारी अशी की, हा जो आजचा आकडा तीन हजार झाला आहे तो पुढे सरकू नये. ठाणे, पुणे, नाशिक ही मुंबईप्रमाणेच महत्त्वाची शहरे आहेत. तेथील आयुक्तांचे कर्तव्य असे की, त्यांच्या हद्दीतील प्रत्येक कोरोना संशयिताला योग्य उपचार मिळतील, त्यांच्या वैद्यकीय चाचण्या व्यवस्थित होतील हे त्यांनी पाहायला हवे.
कोरोनावरील उपचारांबाबत लोकांत जागरुकता नाही. नक्की काय करावे, कोठे जावे याबाबत अज्ञान आहे. मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोनाची बाधा झाली आहे. महापालिकेने त्यांच्या चाचण्या केल्या नसत्या तर ते समजलेच नसते. पण महापालिका आतापर्यंत किती लोकांकडे पोहोचली आहे? जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणारे पोलीस, पालिकेचे कर्मचारी, डॉक्टर्स हे सुरक्षित नाहीत. तरीही ते युद्धभूमीवर पाय रोवून उभे आहेत. पालिका आयुक्तांनी कोरोना लढाईसाठी वेगवेगळे गट निर्माण केले आहेत. प्रत्येकावर जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. काही स्वयंसेवी संस्था (एनजीओ) यांनाही त्यात आणले आहे. या सगळ्यांची नक्की उपयुक्तता काय व त्यात भोजनभाऊ किती? हे वेळीच तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. ही लढाई हवशे, नवशे आणि गवश्यांच्या जोरावर लढता येणार नाही. फुशारक्या मारून विजयाचा झेंडा फडकवता येणार नाही. मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी – चिंचवड, नागपुरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंता वाढवीत आहे. नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा 70 च्या पार गेला आहे. याकडे नागपूरकर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनाही डोळेझाक करता येणार नाही. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या रोज देशाच्या काळजीत भर घालत आहे. मुंबई-पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय. या दोन्ही शहरांतील स्थिती गंभीर आहे. मुंबई-पुण्याला वाचवावे लागेल. वेळ आणीबाणीची आहे.