मुंबई : गेले सव्वा महिने कोरोनाशी संपूर्ण जगाची लढाई सुरु आहे. या लढाईत भारताचे जास्त कौतुक होत असून जास्त लोक संख्या असताना तुलनेने कमी रुग्ण हे भारतात आहेत. आज सकाळी मात्र देशात ऐतिहासिक घटना घडली आहे. या कोरोनाच्या लढाईत प्रामुख्याने पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी हे दिवसरात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून देशासाठी या कोरोनाशी सामना करताना दिसत आहेत. आजचा दिवस देशासाठी नक्कीच खास आहे. या सर्व कोरोना योद्धयाना लष्कराच्या तिन्ही दलांनी मिळून मानवंदना दिली आहे. देशभरात विमानांसह, हेलिकॉप्टर्सनी सर्व प्रमुख कोरोना रुग्णालयांवर करून पुष्पवृष्टी केली जात आहे.
खास वैशिष्ट्ये-
देशात पहिल्यांदाच सर्वत्र अशी मानवंदना देण्यात येत आहे.MI-१७, सुखोई-३०, ट्रान्स्पोर्ट विमाने, चेतक हेलिकॉप्टर्स या सर्वांचा या मानवंदना देण्यात समावेश करण्यात आला आहे. लष्करातर्फे रुग्णालयाबाहेर बँड वादन करण्यात येत असून या लढाईत त्यांचे पाठबळ वाढविण्यासाठी याचे खास आयोजन करण्यात आले आहे. V आकारात युद्ध विमाने झेपावली, ज्याचा अर्थ असा होतो कि या कोरोना लढाईत आपणच जिंकणार आहोत असे दर्शविण्यात येत आहे. पोलीस मेमोरियल येथे मानवंदना देण्यात आली. लष्कर, वायुदल, नौदल अशा तिन्ही दल मिळून दिली जातेय हि खास मानवंदना.
हि मानवंदना म्हणजे जणू काही या कोरोना योद्धयाना शाबासकी व बळ देण्यासाठी करण्यात आली असून प्रत्येकाही भावना ही आता ‘पाठी वरती हात ठेवुनी फक्त लढ म्हणा!’ याचेच द्योतक आहे. जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी आणि गुवाहाटी ते अहमदाबाद अशा प्रकारे संपूर्ण देशात आज हि मानवंदना देण्यात येत आहे.