कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील विविध जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामद्ये नाशिक, ठाणे,रत्नागिरी, कल्याण डोंबिवली या जिल्ह्याचा समावेश आहे.त्यामुळे या लॉकडाऊनचे नागरिकांनी पालन करण्याची मागणी प्रशासनाकडून होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. हा लॉकडाऊन आठवड्याभराचा म्हणजेच ८ जुलैपर्यंत असणार आहे. या टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा किंवा वैद्य्कीय गरजेव्यतिरिक्त सर्व व्यक्तींना घरातून बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आंबा घाट, कुंभार्ली घाट, कशेडी, हातीवले आणि म्हाप्रळ या जिल्ह्याच्या पाच सीमा सील करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी दोन पथके तैनात केली जाणार आहेत. मुंबईकडून येणाऱ्यांना कशेडीआधी एक किलोमीटर अंतरावर एक पथक राहणार आहे. हे पथक विनापास येणाऱ्या वाहनधारकांना परत पाठवण्यासाठी असून दुसरे पथक प्रवेश परवान्याची तपासणी करून वाहनधारकांना प्रवेश देण्यासाठी आहे.
ठाण्यात लॉकडाउन
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. २ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते १२ जुलैच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कटेन्मेंट झोनमध्ये अधिक प्रभावीपणे लॉकडाऊनचे नियम कठोर केले आहेत.
कल्याण डोंबिवलीही बंदच
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात लॉकडाउन होणं गरजेचं आहे असं महापालिकेने म्हटलं आहे. त्यानुसार कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत २ जुलै २०२० च्या सकाळी ७ पासून १२ जुलै २०२० च्या सकाळी ७ पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.इंटरसिटी, एमएसआरटीसी, बस आणि मेट्रोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही. टॅक्सी, रिक्षा यांनाही परवानागी नाही. आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी किंवा घेण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीची परवानगी असेल. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकानं दूध, दुग्धजन्य दुकाने (डेअरी), बेकरी, किराणा दुकाने, भाजीपा इत्यादी खाद्यपदार्थ दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरु राहतील.
नाशिकमध्ये लॉकडाऊन कडक
नाशिक शहरातील वाढती कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यापुढे सायंकाळी 7 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजेनंतर विनाकारण घराबाहेर पडणार्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.