नवी दिल्ली : ऐन परीक्षांच्या काळात करोनानं देशात शिरकाव केला. त्यामुळे शालेय परीक्षांपासून सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. NEET व JEE Mainच्या परीक्षा मे महिन्यामध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी जुलैमध्ये दोन्ही परीक्षा घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यासंदर्भातील वेळापत्रकही निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, अजूनही परिस्थिती चिंताजनक असल्यानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्री पोखरियाल यांनी घोषणा केली कि, ‘विद्यार्थ्यांची सुरक्षा व शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता जेईईची मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान घेण्यात येईल. तर जेईई अॅडव्हॉन्स परीक्षा २७ सप्टेंबर आणि नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल’.
जेईई मेन परीक्षा १८, २०, २१, २२ आणि २३ जुलैला घेण्यात येणार होती. त्यानंतर जेईई अॅडव्हान्सची परीक्षा ऑगस्टमध्ये होणार होती. याचबरोबर वैद्यकीय प्रवेशासाठीची प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात NEET २६ जुलै रोजी घेण्यात येणार होती.
दरम्यान, राज्यातील कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत काल घेण्यात आला. राज्य कृषी आणि शिक्षण संशोधन परिषदेची बैठक कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, “राज्यातील कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार होती. परंतू कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचाविचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे”.