मुंबई | माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच हिट ठरली. या मालिकेच्या चाहत्यांना आता एक सुखद धक्का अनुभवायला मिळणार आहे. मालिकेतील जुनी शनाया पुन्हा एकदा परतणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
रसिका सुनिल ही अभिनेत्री शनायाच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहचली. या शनायाची क्रेझ इतकी वाढू लागली की, या अभिनेत्रीचा स्वत:चा असा चाहतावर्ग तयार झाला. मात्र या अभिनेत्रीने मध्येच मालिका सोडल्यानंतर अनेक प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाल्याचं पहायला मिळालं.
दीड वर्षांपूर्वी फिल्म मेकिंगच्या शिक्षणासाठी रसिकानं मालिका सोडली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली. मात्र आता पुन्हा मालिकेत आपली नटखट शनाया साकारण्यासाठी रसिका तयारअसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अभिनेत्री इशा केसकर सध्या शनायाचं पात्र साकारत असून तीचा अभिनयदेखील सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. मराठी मालिकाविश्वात ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आजही सर्वाधिक पसंती मिळालेली मालिका ठरली आहे.